भारतीय संगीताचा इतिहास व विकास

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, बालभारती,पुणे
२०२१ च्या नवीन अभ्यासक्रमावर आधारीत
भारतीय संगीताचा इतिहास व विकास (६५)
     
       इयत्ता १२ वी
     
        संगीत प्रकाश
      
      (क्यू आर कोड सह) 
 
 लेखक 
डॉ. संदीपान गुरुनाथ जगदाळे
एम.ए. ( संगीत), एम. ए. (इंग्रजी )बी.एड., नेट (संगीत), पीएच.डी (संगीत),संगीत अलंकार, संगीत भास्कर.
दयानंद कला महाविद्यालय,लातूर
 
प्रभाकर पब्लिकेशन, लातूर
 
 
 
संगीत प्रकाश
Sangeet Prakash 
 
ISBN : 978-93-92464-56-0
 
लेखक : डॉ. संदिपान गुरुनाथ जगदाळे
 
प्रकाशन : ३०/ ५/ २०२३
 
मुखपृष्ठ : श्री शिवाजी हांडे 
 
© अभिश्री संदीपान जगदाळे
 
प्रकाशक : प्रभाकर पब्लिकेशन,लातूर
मूल्य :
रुपये १००/-
 
 
लेखकाचे मनोगत 
अभिजीत शास्त्रीय संगीत…! भारताने जगाला दिलेल्या अनेक देण्यांपैकी एक महत्त्वपूर्ण देणगी. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, बालभारती, पुणे यांच्या वतीने २०२१ पासून इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी ‘भारतीय संगीताचा इतिहास व विकास’ या विषयाचे पाठ्यपुस्तक निर्माण केले आहे. हा विषय विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करुन देणारा, व्यक्तिमत्व घडवणारा, जीवनाला एक दिशा देणारा विषय आहे. विद्यार्थी हा विषय आनंदाने शिकत आहेत. परंतु त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा, त्यांचे शिक्षण अत्यंत मनोरंजक पद्धतीने व्हावे, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ व प्रभावी व्हावी या दृष्टिकोनातून या सर्व पाठ्यघटकांवर मी व्हिडिओंची निर्मिती केली. याचे क्यू.आर. कोड निर्माण करुन ते पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातले संगीत विषयाचे हे पहिले पुस्तक आहेत की ज्यातून आता क्यू. आर. कोड च्या माध्यमातून विद्यार्थी अध्यापण करणार आहेत. 
      या पुस्तकाच्या निर्मितीसाठी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.लक्ष्मीरमणजी लाहोटी, सरचिटणीस मा.रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव मा. सुरेशजी जैन व समस्त संचालक मंडळ यांनी वेळोवेळी प्रेरणा दिली त्याबद्दल मी अंत:करणपूर्वक आभार मानतो. हे पुस्तक दर्जेदार व्हावे यासाठी नेहमीप्रमाणे प्रोत्साहन देणारे कार्यकुशल प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, संगीत विभाग प्रमुख डॉ.देवेंद्र कुलकर्णी व कार्यालयीन अधीक्षक रुपचंद कुरे यांनी वेळोवेळी बहुमोल मार्गदर्शन केले त्याबददल त्यांचेही मी ऋण व्यक्त करतो. या ग्रंथासाठी आकर्षक मुखपृष्ठ करून दिल्याबद्दल श्री शिवाजी हांडे यांचे मनापासून आभार तसेच श्री गुळवे यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार.
     अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन निर्माण करण्यात आलेले हे माझे एकोणिसावे पुस्तक संगीताचे अध्यापन करणारे सर्व गुरुजन, इयत्ता बारावी वर्गातील विद्यार्थी, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या विविध परीक्षा देणारे परीक्षार्थी याबरोबरच रसिक श्रोत्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही. माझ्या इतर ग्रंथांप्रमाणे याही ग्रंथांचे आपण स्वागत कराल असा मला विश्वास आहे.
 
दिनांक १०/ ६/ २०२३
 
अनुक्रमणिका 
अ.क्र. घटकाचे नाव.       पृष्ठ क्रमांक
• पाठ्यक्रमाची ओळख
• घटक निहाय गुण विभागणी  
 
१) संगीत शिक्षण पद्धती
   १.१) गुरु शिष्य परंपरा व आधुनिक संगीत शिक्षण पद्धती
   १.२ संगीत शिक्षणात विज्ञानाचा सहयोग
 २) भारतीय संगीताचा इतिहास
     २.१ स्वातंत्र्यपूर्व कालखंड
     २.२ स्वातंत्र्योत्तर कालखंड
३) सांगीतिक परिभाषा
४) गायन
   ४.१  ख्याल
    ४.२ ठुमरी
    ४.३ गझल
    ४.४ पोवाडा
५) वादन
      ५.१ सतार 
      ५.२ सनई
      ५.३ जलतरंग 
      ५.४ ढोलकी
६)  ताल परिचय
   ६.१ दिपचंदी    ६.४ एकताल   ६.७ भजनी
   ६.२ धुमाळी     ६.५ चौताल   
   ६.३ धमार        ६.६ खेमटा 
७) नृत्य
     ७.१ भरतनाट्यम्    ७.३ लावणी
     ७.२ कुचीपुडी        ७.४ भांगडा
 ८) नाट्य
 महाराष्ट्रातील नाट्यसंगीत (स्वातंत्र्योत्तर कालखंड)
 ९) चरित्र
     ९.१ पं. वि. दि. पलुस्कर   ९.३ पं. मृणालिनी साराभाई
    ९.२ पं. रविशंकर           ९.४ बालगंधर्व 
 
https://youtu.be/5bMqkl5kGE4
 
भारतीय संगीताचा इतिहास व विकास (६५)
नवीन पाठ्यक्रमानुसार
घटक निहाय गुणविभागणी
|अ. क्र. | घटक  | गुण   | विकल्पासह गुण |
 
१ संगीत शिक्षण (पारंपरिक व आधुनिक) १४ १४
२ भारतीय संगीताचा इतिहास १४ २८
३ सांगीतिक परिभाषा १२ १४
४ गायन              ८ १६
५ वादन              ७ १४
६ ताल परिचय     १२ १६
७ नृत्य               ७ १४
८ नाट्य            १४ १४
९ चरित्र           १२ १४
एकूण            १०० १४४
 
 
१ संगीत शिक्षण
१.१ गुरुशिष्य परंपरा व आधुनिक संगीत शिक्षण पद्धती.
 
१) प्रस्तावना :-
    गुरूच्या उपकाराने कृतज्ञ झालेल्या कोण्या एका शिष्याने म्हंटले आहे की,
    “गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू,
    गुरुर देवो महेश्वरा ।
    गुरू साक्षात परब्रह्म,
    तस्मे श्री गुरवे नमः।।”
    
     भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेला अगदी प्राचीन काळापासूनच आपल्या देशात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. अगदी पुरातन रामायण, महाभारत काळापासून गुरुकुलात प्रतिभाशाली विदयार्थ्यांची निवड करून त्यांना गुरुकुलात शिक्षण दिले जात असे.
     प्राचीन गुरु-शिष्य परंपरेपासून आधुनिक संगीत शिक्षण पद्धतीचा प्रवास कशा पद्धतीने झाला हे पुढील मुद्द्यांच्या आधारे पाहता येईल.
     
२) गुरु-शिष्य परंपरेचे महत्व :-
   आपल्या देशात गुरूंना संगीत क्षेत्रात खूप मानाचे स्थान होते. अनेक राजे-महाराजे व बादशहा मोठ्या संगीत तज्ञांना आपल्या दरबारात  ठेवून घेत असत. अनेक राजे व बादशहा अशा थोर गुरूंचे शिष्यत्व पत्करत. राजाश्रय लाभल्यामुळे हे गुरू रात्रंदिवस संगीत साधना करून विद्यादान करत असत.
   
३) गुरुशोधासाठी पायपीट  :-
     पूर्वीच्या काळी गुरू सहज उपलब्ध होत नसत.संगीत शिक्षणासाठी अनेक शिष्यांना मैलोनमैल पायपीट करावी लागत असे. गुरूच्या घरी कामे करून गुरूंची मर्जी संपादन करावी लागत असे.शिष्य योग्य की अयोग्य याची परीक्षा घेऊनच गुरू आपल्या शिष्यांना गंडा बांधत असत. अशाप्रकारे त्यांचे शिक्षण सुरू व्हायचे.
     
४) गुरुमुखी विद्या :-
   संगीत ही गुरुमुखी कला असल्याने शिष्यांना गुरूंच्या समोर बसून विद्या प्राप्त करावी लागे. त्या काळात ग्रंथ नव्हते. संगीत जतन करण्यासाठी ध्वनी मुद्रणाची सोय नसल्यामुळे शिष्यांना गुरुकुल पद्धतीशिवाय पर्याय नव्हता. गायन पद्धती, आवाज व स्वर लावण्याचे तंत्र, राग विस्तार कसा करावा अशा अनेक बाबी गुरूच समजावून सांगत.त्यामुळे आजही संगीतात गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व टिकून राहिले आहे.
 
५) घराण्यांची उदय :-
    १४ व्या शतकाच्या उत्तरार्धात घराण्यांचा उदय झाला. यात ग्वाल्हेर, जयपूर,आग्रा, व किराणा या चार घराण्यांचा उल्लेख करता येईल.घराण्यांच्या उदयामुळे संगीतक्षेत्रात अनेक बदल झाले. शास्त्रीय गायनातील ख्यालगायनाचा प्रचार होऊ लागला.
    
 
६) आधुनिक संगीत शिक्षण पद्धती :-
    साम्राज्य पसरवणे व संपत्ती जमा करणे हा इंग्रजांचा हेतू होता. त्यामुळे इंग्रजांनी भारतीय कला व संगीताकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कलावंतांना संस्थानिकांचा अथवा कोठ्यांचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे संगीताची प्रतिष्ठा कमी झाली.
 
७) पं.भातखंडे व पं.पलुस्कर यांचे योगदान :-
     संगीत लयाला जात असतानाच महाराष्ट्रात दोन तेजस्वी तारे जन्माला आले. ते तारे म्हणजेच पं. वि. ना.भातखंडे व पं. वि. दि. पलुस्कर. पं. वि.दि. पलुस्कर गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. या पाठोपाठ पं. वि. ना. भातखंडे यांनीही मॉरिस कॉलेज, माधव संगीत विद्यालय अशा विद्यालयांची सुरुवात केली. या विष्णुद्वयांनी भारतीय संगीतात शास्त्र व क्रियात्मक संगीत यांचा समन्वय घडवून आणला. शास्त्रशुद्ध स्वरलेखन करून अनेक ग्रंथांची निर्मिती केली. स्वरलिपीची निर्मिती करून भारतीय संगीत जिवंत ठेवले.
     
 ८) परीक्षा पद्धतीची सुरुवात :-
   आधुनिक काळामध्ये संगीत विषयात परीक्षा पद्धती सुरू झाली आहे. अभ्यासक्रम वेळेमध्ये पूर्ण करण्याकडे गुरूंचा अधिक कल राहिला. श्रोत्यांची अभिरुची लक्षात घेता कलाकाराला विविध गीतप्रकार सादर करण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे आधुनिक काळामध्ये एक शिष्य वेगवेगळ्या गुरूंकडे वेगवेगळे गीतप्रकार शिकू लागला. थोडक्यात आधुनिक काळामध्ये एकाच गुरूकडे अनेक शिष्य आणि एक शिष्य अनेक गुरूंकडे संगीताची तालीम घेऊ लागला.
   
९) ऑनलाईन शिक्षण :-
     कधीकाळी काही नामांकित गुरू विदेशातील शिष्यांना ऑनलाईन पद्धतीने संगीताचे शिक्षण द्यायचे.पण आजकाल सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने संगीत शिक्षण दिले जात आहे. एकमेकांपासून दूर अंतरावर असलेले गुरू Online शिक्षण पद्धतीने शिष्याला गायन, वादन, नृत्य शिकवताना दिसतात. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ही शिक्षण पद्धती अत्यंत सोयीची व लोकप्रिय होताना दिसते.
 
१०) शालेय शिक्षण :-
   आज प्राथमिक शाळांपासून पदवी व पदव्युत्तर विदयार्थ्यांना संगीत शिकण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यातून हजारो विद्यार्थी दरवर्षी संगीताचे शिक्षण घेत आहेत. यातून विदयार्थ्यांना बी. ए. एम. ए. व पी.एच.डी इत्यादी पदव्या मिळत आहेत. यातूनच संगीत शिक्षक,अधिष्ठाता अशा पदांची निर्मिती झाली.
   
११) आधुनिक गुरुकुल पद्धती :-
     आज केंद्रशासनाबरोबरच राज्यसरकारांनी गुरु-शिष्य टिकवून परंपरा ठेवण्यासाठी गुरुकुलांची सुरुवात केली आहे. यात शासनाकडून गुरूंची नियुक्ती केली जाते. तर गुणवान विदयार्थ्यांची निवड करून त्यांना शिष्यवृत्ती देऊन संगीत शिकविले जात आहे.या गुरुकुलांतून विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवासाची सोय केली जाते.अशा विद्यार्थ्यांना ग्रंथालय, ध्वनीफितींचा संग्रह, रेकॉर्डिंगचे तंत्र, विविध चर्चासत्रे, शिबिराचे आयोजन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा सोयी पुरवल्या जातात.
 
१२) समारोप :-
थोडक्यात असे म्हणता येईल की गुरु-शिष्य परंपरेत अनेक चांगल्या बाबी होत्या त्याच बरोबर काही दोष व उणीवाही होत्या. काळ बदलत गेला अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ज्ञानाचे अनेक कवाडे खुली झाली.ज्याचा लाभ वर्तमान स्थितीत संगीत विषयाचे विद्यार्थी घेताना दिसत आहेत.
 
 
 
१.२ संगीत शिक्षणात विज्ञानाचा सहयोग
 
१) प्रस्तावना :-
      एक काळ असा होता की, संगीत शिक्षण हे प्रतिष्ठितांच्याच ताब्यात होते. घराणेशाहीत तर गुरु म्हणतील तीच पूर्व दिशा असायची. त्या काळात अनेक वेळा गुरुंचे दोषही शिष्यांना स्विकारावे लागायचे. परंतु आज विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक शोध लागलेले आहेत. या प्रगतीचा फायदा संगीत क्षेत्रात झाला नाही तरच नवल. संगीत विकासात विज्ञानाचा सहयोग कसा होत आहे ते खालील मुद्यांच्या आधारे पाहता येईल.
 
२) मुद्रण कलेचा शोध :-
     गुरु-शिष्य परंपरेत शिष्यांना गुरू समोर बसून विद्या ग्रहण करावी लागत असत. त्याकाळी संगीत जतन करुन ठेवण्याची सोय नव्हती. परंतु कॉस्टर नावाच्या एका डच माणसाने मुद्रण यंत्राचा शोध लावला. जोहन गुटेनबर्ग याने १४४० मध्ये पहिला छापखाना सुरू केला. साधारणता १९  व्या शतकात भारतात मुद्रण कला अस्तित्वात आली. त्यामुळे संगीतातील दुर्मिळ चिजा, स्वरलिपी व इतर सांगीतिक साहित्य छापून ठेवण्याची सोय झाली. पुस्तकाच्या माध्यमातून संगीत सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला. अगदी सुरुवातीच्या काळात अक्षरांची खिळे जोडून छपाई केली जायची. त्यानंतर ऑफसेटच्या आगमनामुळे पुस्तक छापणे अल्पावधीतच होऊ लागले. पुढे संगणकाचा शोध लागला. त्याचाही फायदा ग्रंथनिर्मितीत होऊ लागला. अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन मुद्रण सुबक व आकर्षक होऊ लागले. एवढेच नाही तर संगणकाच्या माध्यमातून ग्रंथ जतन करुन ठेवता येऊ लागले. अशाप्रकारे मुद्रण यंत्राच्या विज्ञानरुपी सहयोगाने संगीत शिक्षण सुलभ झाले.
 
३) ध्वनीक्षेपक :-
     पूर्वी ध्वनीक्षेपकाची  सोय उपलब्ध नव्हती. त्यामुळे गायकांना जोरात ओरडून गाणे गावे लागायचे. वादकांनाही आपली वाद्ये जोरात वाजवावी लागायची. यामुळे फारतर १०० श्रोत्यांपर्यंत गायक-वादकाचा आवाज स्पष्ट ऐकू जायचा. परंतु विज्ञानाने ध्वनीक्षेपकाचा शोध लावला. त्यामुळे गायक-वादकावरील ताण कमी झाला. संगीतातील बारकावे श्रोत्यांपर्यंत सहज पोहचू लागले. या पूर्वी गायक अथवा वादक कसे गात आहेत किंवा कसे वाजवित आहेत हे त्यांना समजत नव्हते. परंतु मॉनिटरच्या माध्यमातून कलावंताना आपण कशाप्रकारे सादरीकरण करीत आहोत याची जाणीव होते. अशाप्रकारे  गायन-वादनातील दोष निवारण्यासाठी अत्याधुनिक ध्वनीक्षेपकाचा उपयोग केला जात आहे.
 
४) ध्वनीमुद्रणाची सोय :-
     आपले गायन कसे संग्रहित करुन ठेवता येईल यासाठी शास्त्रज्ञांचा प्रयत्न चालू होता. परंतु ध्वनीमुद्रणाच्या शोधामुळे हा प्रश्न सुटला. आज संगणकाच्या माध्यमातून विविध ट्रॅक्सचा वापर करुन ध्वनी मुद्रणाचे काम केले जात आहे. गाण्यातील दोष निवारण्यासाठी ध्वनीमुद्रण कला आज सक्षम झाली आहे. विज्ञानाच्या उत्कर्षामुळे यात नित्य नव्या विशेषता व शक्यता जोडल्या जात आहेत.
 
५) चित्रीकरणाची सोय :-
     एकेकाळी संगीताच्या मैफिली वारंवार होत नव्हत्या. त्यामुळे लोकांना रेडिओ अथवा टेपरेकॉर्डरद्वारे संगीत ऐकावे लागायचे. परंतु विज्ञानाने चित्रीकरणाची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यामुळे आपण आपल्या आवडत्या गायक, वादक व नर्तकाला जवळून पाहू शकतो. अशावेळी अगदी मागे बसलेल्या श्रोत्यांना स्वरमंचावरील कलाकार काय गातोय हे ऐकू यायचे. परंतु तो कसा गात
आहे? वादक वाद्यावर कशी बोटे फिरवत आहे? नर्तकाच्या भावमुद्रा इ.बाबी तो दूरवरुन पाहू शकत नव्हता. परंतु आज विज्ञानाने चित्रीकरणासाठी उच्च दर्जाचे कॅमेरे दिलेले आहेत. त्यामुळे स्क्रीनवरुन आपण अगदी मागे बसूनसुद्धा या सर्व बाबींचा आस्वाद घेऊ शकतो. याचबरोबर अनेक कलावंतांच्या व्हिडीओ सीडीज,डीव्हीडी निघाल्या आहेत. याचाही लाभ संगीत शिक्षणात होत आहे.    
 
५) दृक- श्राव्य माध्यमांचा सहयोग :-
विज्ञानाच्या प्रगतीमुळे रेडिओ, टेपरेकॉर्डर व दूरदर्शन इत्यादि दृक-श्राव्य माध्यमांच्या शोधामुळे संगीत क्षेत्रातही क्रांती घडवून आणली आहे. रेडिओमुळे एकाच ठिकाणी बसून विविध केंद्रावरुन प्रसारीत होणारे संगीत आपण एका ठिकाणी बसून ऐकू शकतो. टेपरेकॉर्डरसारख्या माध्यमामुळे आपणास आवडणाऱ्या कलावंताचे गायन-वादन ध्वनीमुद्रित करु शकतो. दूरदर्शन वरील विविध रियालिटी शो मुळे नवोदित कलावंतांना संधी मिळत आहे.
 
 
७) संगणक :-
     एकविसावे शतक हे माहितीचे युग घेऊन अवतरले. संगणकामुळे संगीत क्षेत्रातसुद्धा क्रांती घडून आली. संगणकाची साठवण शक्ती अमर्यादित आहे. त्यामुळे आपणास हवे ते संगीत यात साठवून ठेवू शकतो. इंटरनेटच्या माध्यमातून जगातील संगीतप्रकार घरबसल्या ऐकू व पाहू शकतो. विविध संकेतस्थळावरुन (वेबसाईट) आपण आपल्याला आवडेल ते संगीत, संगीतकार, कलाकारांची माहिती प्राप्त करु शकतो. राग्या याची आवाज व चित्रांची प्रत उत्तम दर्जाची असते. अशा विविध वैशिष्ट्यांमुळे संगणक हे संगीत विकासात अत्यंत मोलाची भूमिका निभावत आहे.
 
 
८) इलेक्ट्रानिक वाद्ये :-
     विज्ञानाच्या प्रगतीमुळे इलेक्ट्रॉनिक वाद्यांची निर्मिती झाली. यामध्ये  गिटार सिंथेसायाझार, ऑक्टो पॅड रिदम मशीन, इलेक्ट्रॉनिक तानपुरा,साथसंगत करणारे तालवाद्य तबला व लहेरा यंत्र इत्यादी शोधामुळे संगीताच्या अभ्यासकांना मोठी सोय झाली आहे. इलेक्ट्रॉनिक तंबोरा हे यंत्र आकाराने लहान आहे. त्यामुळे या यंत्राला आपण कोठेही घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे रियाजाबरोबरच मैफलीतही हा तानपुरा वापरत आहेत. रियाजाच्या वेळी ताल असणे गरजेचे असते. इलेक्ट्रॉनिक तबला हे वाद्य ताल देण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. लहेरा यंत्र सुद्धा अशाच पद्धतीने तयार केलेले आहे. त्यामुळे तबलावादकांना हे वाद्य वरदान ठरले आहे. ही सर्व वाद्ये वीजेवर चालतात. जेव्हा वीज उपलब्ध नसते तेव्हा ही वाद्ये बॅटरीवर चालतात. अशाप्रकारे संगीत शिक्षणात या वाद्यांचे मोलाचे योगदान आहे.
 
८) मोबाईल :-
     आज मोबाईल म्हणजेच भ्रमणध्वनीचा वापर अनिवार्य झाला आहे. या साधनांद्वारे जगातील व्यक्तींशी  संपर्क तर होतोच. परंतु संगीत अध्ययनासाठी हे साधन उपयुक्त
ठरत आहे. भ्रमणध्वनी मध्ये १ जीबी पासून ते २५६ जीबीपर्यंतचे मेमरी उपलब्ध आहे.
त्यामुळे आपण यात चित्रपटगीतापासून ते ख्याल गायनापर्यंत शेकडो गीतप्रकार साठवून ठेवू शकतो. एखादे गाणे अथवा व्हिडिओची रेकॉर्डिंग करून तो इडिट करू शकतो. यू ट्यूब वरून विविध संगीत विषयक व्हिडिओ पाहू शकतो. विविध सांगीतिक अँप छा लाभ होत आहे. संगणकाची सर्वच वैशिष्ट्ये या छोटाशा मोबाईल मध्ये आहेत. यात विविध वाद्यांचे अँप्स असल्याने रियाज करण्यासाठी व संगीत ऐकण्यासाठी याचा उपयोग होत आहे. त्यामुळे मोबाईल हे माध्यम संगीत अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व रसिक श्रोत्यांसाठी उपयुक्त ठरले आहे.
 
९) ऑनलाईन शिक्षण :-
कोविड -१९ च्याप्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धती ही रूढ होत आहे. संगीत शिक्षण सुद्धा याला अपवाद नाही. शाळा, संगीत विद्यालये व महाविद्यालयात बसलेले संगीत शिक्षक शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन संगीताचे धडे देत आहेत. मायक्रोसॉफ्ट टीम, गुगल मीट, झूम, वेबेक्झ अशा अँप्स वरून संगीत शिक्षण घेणे सुलभ झाले आहे.
 
१०) समारोप :
     थोडक्यात असे म्हणता येईल की विज्ञानाच्या प्रगतीमुळे संगीत शिक्षण सुलभ झाले आहे. तसेच संगीत रसिकांसाठी विज्ञानाने अनेक दरवाजे उघडून दिलेले आहेत. या सर्वच साधनांचा वापर करुन आपण आपल्या संगीतात आमूलाग्र बदल घडवून आणूयात व आपल्या देशातील स्वर्गीय सप्तस्वर चिरकाल टिकवून ठेवूयात.
     
 
२ भारतीय संगीताचा इतिहास
२.१  स्वातंत्र्यपूर्व कालखंड 
१) प्रस्तावना :-
संगीताचा उगम हा सृष्टी निर्मिती बरोबरच झाला. परंतु भारतीय संगीताचा उगम नेमका कधी झाला. या बाबतीत मतभेद आहेत. भारतीय संगीताच्या इतिहासाचे चार कालखंडात विभाजन करता येईल.
१) अदिम कालखंड
२) मध्ययुगीन कालखंड
३) प्राचीन कालखंड
४) अर्वाचीन कालखंड
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतीय संगीताचा इतिहास कसा होता ते पाहुयात.
२) स्वातंत्र्यपूर्व कालखंड  (१८५० – १९४७ ) :-
भारतीय संगीताचे खरे स्वरुप १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात प्राप्त झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात संगीताचा विकास कसा होत गेला ते खालील प्रमाणे पाहता येईल.
 
सा) ब्रिटीश काळात संगीत :-
   इंग्रज हे भारतात व्यापार करण्यासाठीच
आले होते. त्यांनी भारतीय कलेकडे कधीच लक्ष दिले नाही. त्यांनी संगीताला आश्रय दिला नाही. त्यामुळे आपले संगीत कनिष्ठ लोकांच्या हातात गेले. त्या काळात संगीत शिकणे पाप ठरु लागले. असे असले तरी काही गुणी लोकांनी भारतीय संगीत जपून ठेवले.
 
रे) ब्रिटीश काळात संगीताचे संवर्धन :-   
    इंग्रजांनी भारतीय संगीताकडे दुर्लक्ष केले. परंतु काही कलावंतांनी व संस्थानिकांनी भारतीय संगीताचे रक्षण केले. अनेक संस्थानिकांनी आपल्या दरबारात गायक ठेवले. त्यांनी संगीताची साधना केली. इंग्रजांनी जरी संगीताकडे दुर्लक्ष केले तरी काही इंग्रज लेखकांनी संगीतावर ग्रंथ लिहीले. या मध्ये विलियम जोन्स, कॅप्टन डे, कॅप्टन विलार्ड यांचा उल्लेख करता येईल.
 
ग) ब्रिटीश काळात ग्रंथ निर्मिती :- 
   अनेक व्यक्तींनी ब्रिटीश काळात ग्रंथ
लेखन केले.  
जयपुरचे राजे प्रतापसिंह – ‘संगीत सार’ 
महमद रजा – ‘नगमाते आसफी’
कृष्णानंद व्यास – ‘राग कल्पद्रुम’
सुरेंद्र मोहन टागोर – ‘युनिव्हर्सल हिस्टरी ऑफ म्युझिक’
 
म) ब्रिटीश काळातील गीत प्रकार : –
     ब्रिटीश काळात अनेक गीत प्रकार
जन्माला आले. यामध्ये नाटयगीत हा प्रकार जन्माला आला. पं. भास्करबुवा बखले, पं. गोविंदराव टेंबे यांनी मराठी रंगभूमीला योगदान दिले. १९ व्या शतकाच्या पुर्वार्धात भावगीत व भक्तीगीत इत्यादी प्रकार रुढ झाले. त्यानंतर चित्रपट सृष्टीमध्ये पार्श्वगायन हा प्रकार जन्माला आला. नुरजहाँ, के. एल. सहगल, लता मंगेशकर यांनी या गायन प्रकाराला लोकप्रियता मिळवून दिली.
 
प) पं.पलुस्कर व पं.भातखंडे यांचे योगदान :- 
   ब्रिटीश काळात भारतीय संगीत लयाला जात होते. अशावेळी महाराष्ट्रातील दोन महान कलावंतांनीसंगीत जगताला मोलाचे योगदान दिले. ते दोन थोर कलावंत म्हणजेच पं. वि. दि. पना.भातखंडे होत. त्यांनी संगीतासाठी खालील प्रमाणे योगदान दिले.
१) शास्त्र व क्रियात्मक संगीताचा समन्वय घडविला.
२) अनेक ग्रंथांची निर्मिती केली.
३) संगीत परिषदांचे आयोजन करुन चर्चा घडवून आणली.
४) स्वरलिपीची निर्मिती केली.
५) संगीत विद्यालयांची स्थापना केली.
 
ध) आकाशवाणी केंद्राची सुरुवात :-
    १९२४ साली देशात आकाशवाणी केंद्र सुरु झाले. आकाशवाणीचे संचालक श्री बुखारी यांनी शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन दिले. पं. रविशंकरासारखे महान कलावंत आकाशवाणीला लाभले. त्यांनी नवीन राग, नवीन वाद्यवृंदांच्या रचना बसविल्या. अशा
प्रकारे आकाशवाणी केंद्राच्या माध्यमातून भारतीय संगीत घराघरात जाऊन
पोहचले.
 
नी) संगीत संस्थांची स्थापना :- 
   संगीताचा प्रचार व्हावा यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक संगीत संस्थांची स्थापना झाली. त्या काळात गायक उत्तेजक मंडळी, उस्ताद अब्दुल करीम खाँ यांनी ‘आर्य संगीत विद्यालय पं.गजाननबुवा जोशी यांनी ‘शिवानंद संगीत प्रतिष्ठान’ची स्थापना केली. याचबरोबर ‘पूना गायन समाज’ भारत गायन समाज अशा अनेक संगीत संस्थांनी मैफ़ली घडवून आणल्या व संगीताचा प्रचार केला.
   
३) समारोप :-
   थोडक्यात असे म्हणता येईल की इंग्रजांच्या अत्याचारातून भारतीय संगीताला मुक्त करण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये काही इंग्रज लेखकांनी ग्रंथनिर्मिती केली तर अनेक भारतीयांनी सुद्धा ग्रंथलेखन करुन भारतीय संगीत जोपासले. पं.भातखंडे व पं.पलुस्कर यांनी तर भारतीय संगीतात प्राण फुकण्याचे कार्य केले. आकाशवाणी केंद्र व संगीत संस्थांच्या माध्यमातून संगीताचा प्रचार झाला. अशाप्रकारे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय
संगीताचा विकास झाला.
 
 
२.२ स्वातंत्रोत्तर कालखंड
 
१) प्रस्तावना :-
संगीताचा उगम सृष्टी निर्मिती बरोबरच झाला. परंतु भारतीय संगीताचा उगम नेमका कधी झाला. या बाबतीत मतभेद आहेत. भारतीय संगीताच्या इतिहासाचे चार कालखंडात विभाजन करता येईल.
१) अदिम कालखंड
२) मध्ययुगीन कालखंड
३) प्राचीन कालखंड
 ४) अर्वाचीन कालखंड
स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतीय संगीताचा इतिहास कसा होताते पाहुयात.
२) स्वातंत्र्योत्तर कालखंड:-
   १५ ऑगष्ट, १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. देशात आनंदाचे वातावरण पसरले. अनेक संस्थाने देशात विलीन झाली. जे कलावंत राजाश्रयी होते ते लोकांमध्ये आले. स्वातंत्र्यानंतर संगीताचा
विकास कसा झाला ते खालील मुद्दयांच्या आधारे पाहता येईल.
 
सा) शासनाकडून संवर्धन :- 
   स्वातंत्र्यानंतर संगीताला शासनाने संरक्षण दिले. १९५२ पासून संगीत कलावंतांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविले
जाऊ लागले.१९५३ मध्ये संगीत नाटक अकादामी व १९५४ मध्ये ललित कला अकादमीची स्थापना झाली. केंद्र सरकार व राज्यसरकार कडून कलावंताचं कौतूक होऊ लागले.
 
रे) लोककलावंतांना राजाश्रय :- 
   शास्त्रीय संगीत हे लोकसंगीतातूनच
निर्माण झाले. अशा लोककलांचे संवर्धन करण्याची जबाबदारी शासनाने घेतली. महाराष्ट्रातील अनेक लोक कलांना समाज मान्यता नव्हती. म्हणूनच शासनाने लोककला उत्सवांचे आयोजन केले. वृध्द कलावंतांना मानधन दिले. अशा प्रकारे शासनाने लोककलांचे संवर्धन केले.
 
ग) ग्रंथ निर्मिती :- 
   स्वातंत्र्यानंतर संगीत विषयक अनेक ग्रंथांची निर्मिती झाली. आचार्य ब्रहस्पती यांनी राग रहस्य, भरत का संगीत सिध्दांत, पं. कुमार गंधर्व यांनी, अनुपराग विलास, पं. विनायकबुवा पटवर्धन यांनी राग विज्ञान इत्यादी ग्रंथ लिहीले.
   
म) दृक-श्राव्य माध्यमातून संगीत विकास :
   आकाशवाणी व दूरदर्शनवरुन अनेक संगीताचे कार्यक्रम प्रसारीत होऊ लागले. विविध कलावंतांना व्यासपीठ मिळाले. विविध स्पर्धाचे आयोजन करुन उत्तम कलावतांचा सन्मान केला. शास्त्रीय संगीताबरोबरच सर्व संगीत प्रकार घराघरात
पोहंचविण्याचे काम दूरदर्शन व रेडिओने केले.
 
प) संगीत महोत्सवाचे आयोजन :-
   स्वातंत्र्यानंतर देशात अनेक ठिकाणी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे येथे सवाई गंधर्व महोत्सव, पुणे फेस्टीव्हल, वेरुळ महोत्सव, बाणगंगा महोत्सव, तानसेन संगीत समारोह अशा अनेक संगीत महोत्सवातून संगीताचा प्रचार व प्रसारहोत आहे.
   
ध) शालेय शिक्षण व संगीत :- 
   आज प्राथमिक शाळेपासून ते विद्यापीठ
स्तरापर्यंत संगीताचे शिक्षण दिले जात आहे. याच बरोबर अ.भा. गांधर्व मंडळ, मुंबई, प्राचीन कला केंद्र, चंदीगड, प्रयाग संगीत समीती अलाहाबाद इत्यांदी संस्थाकडून संगीताच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. यामुळे अनेक कलावंत निर्माण होत आहेत.
 
नी) वैज्ञानिक शोध व संगीत :-
   २१ व्या शतकात विज्ञानाने अनेक शोध
लावले विज्ञानाने संगीत क्षेत्राला अनेक साधने दिली आहेत. संगणकासारख्या
माध्यमातून जगभरातील संगीत घरी बसून पाहू शकतो. अनेक इलेक्ट्रॉनिक्स वाद्ये बाजारात उपलब्ध झाली आहेत. याचाही फायदा संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे.
 
३) समारोप :-
  २१ व्या शतकात संगीताचा खूप विकास झाला. पुर्वी मर्यादित स्वरुपातील संगीत आज घराघरात जाऊन पोहंचले आहे.पुर्वीच्या संगीतामध्ये जे दोष होते त्या दोषांचे निवारण झाले आहे. परंतु आधुनिक युगात रिमिक्स सारखे संगीत प्रकार भारतीय संगीताला मारक ठरत आहेत. विनाशाकडे जाणाऱ्या संगीताला आपण वाचवुयात.
 
 
३. सांगीतिक परिभाषा
 
३.१) आलाप:
रागाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन विलंबित किंवा
मध्यलयीत केलेला स्वरविस्तार म्हणजे ‘आलाप’ होय.
३. २) तान :
रागाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन द्रुतलयीत केलेला स्वर विस्तार म्हणजे ‘तान’ होय.
३.३) बोल आलाप :
रागाच्या नियमानुसार बंदिशीमधील बोलांच्या
आधारे म्हटलेल्या आलापांना ‘बोल आलाप’ म्हणतात.
३. ४) बोलतान :
बंदिशीमधील बोलांच्या आधारे म्हटली जाणारी तान म्हणजे ‘बोलतान’. बंदिशीमधील बोलांचा अंतर्भाव त्या तानेमध्ये करणे म्हणजे ‘बोलताना’ होय.
३.५) कणस्वर :
एक स्वर घेताना पुढच्या किंवा मागच्या स्वराला स्पर्श करण्याच्या क्रियेला ‘कणस्वर’ असे म्हणतात. जसे ; राग भूपालीमध्ये धैवत घेताना षड्ज स्वराचा कणस्वर घेतला जातो.
३. ६) गमक :
स्वरांचे कंपन करून त्यांना वजन देण्याच्या क्रियेला ‘गमक’ असे म्हणतात.
३.७) झाला :
सतारीमध्ये चिकारी किंवा बाजाच्या तारांवर
मिझराबद्वारा आघात करत ‘दारारारा, दारारारा’ हा प्रकार द्रुतलयीत वाजवण्याच्या या क्रियेला ‘झाला’ असे म्हणतात.
३.८) जाती :
स्वर संख्येच्या आधारावर रागाच्या तीन जाती
पडतात. १. ओडव -५  स्वर, २. षाड्व -६ स्वर, ३. संपूर्ण – ७ स्वर
३.९) तोडा :
सरोद, सतार या वादयांवर वाजवल्या जाणाऱ्या  तानांना ‘तोडा’ असे म्हणतात.
३.१०) खटका :
चार किंवा चारपेक्षा अधिक स्वरांची गोलाई निर्माण करून द्रुत गतीत गायली जाते, त्यास ‘खटका’ असे म्हणतात. रेसानिसा, सारेनिसा
 ३.११) मुर्की :
जवळजवळच्या २ – ३ स्वरांचा शीघ्रतेने आलटून पालटून प्रयोग करणे म्हणजे ‘मुर्की’होय. धम प रेनि सा 
३.१२) अलंकार :
आरोह-अवरोहयुक्त स्वरांच्या क्रमिक रचनेस
‘अलंकार’ असे म्हणतात. उदा. सारेग, रेगम, गमप, नीधप
३.१३) मींड :
एका स्वराकडून दुसऱ्या स्वराकडे घसरत जाताना मधल्या स्वरांना स्पर्श करून जाणे म्हणजे ‘मींड’ होय.
३.१४) न्यास :
गाताना किंवा वाजवताना रागामध्ये ज्या स्वरांवर थांबतो त्या स्वराला ‘न्यास स्वर’ म्हणतात.
३. १५) रजाखानी गत :
तत प्रकारच्या वादयांवर द्रुतलयीमध्ये वाजवल्या जाणाऱ्या गतीला ‘रजाखानी गत’ असे म्हणतात.
३.१६) मसीतखानी गत :
तत प्रकारच्या वादयांवर विलंबित लयीमध्ये वाजवल्या जाणाऱ्या गतीला ‘ मसीतखानी गत’ असे म्हणतात.
३.१७) मूर्च्छना :
गायन वादनात स्वरांची कोमल तीव्र रूपे सांभाळून क्रमवार स्वरसप्तक बनवणे म्हणजे ‘मूर्च्छना’ होय.
३.१८) जमजमा :
तंतूवादयावर मिझराबच्या (नखीच्या)
एका आघातामध्ये एकाच वेळी दोन स्वर वाजवणे याला ‘जमजमा’ म्हणतात.
३.१९) बेहलावा :
आलापामध्ये घेतलेली मध्यलयीतील छोटी तान म्हणजे ‘बेहलावा’ असे म्हणतात.
रागवाचक स्वरसमूहाला ‘पकड’ असे म्हणतात.
३. २१) घसीट :
नखीने तार छेडल्यावर पडदयावर ज्या स्वरावर बोट ठेवले असेल तेथूनच तार ओढून घसरत मिंड घेऊन स्वरांपर्यंत नेण्याच्या क्रियेला ‘घसीट’ म्हणतात.
३.२२) सूत :
खालच्या स्वरावरून वरच्या स्वरावर किंवा वरच्या स्वरावरून खालच्या स्वरावर अनुनासिक उच्चारात मींड पद्धतीने स्वर म्हणणे ह्या क्रियेला ‘सूत’ म्हणतात.
३.२३) थाट :
राग निर्मितीची क्षमता असलेल्या सप्त स्वरांच्या समूहाला ‘थाट’ असे म्हणतात.
 
 
४. गायन
४.१) ख्याल.
१) प्रस्तावना :-
   भारतीय संगीताचा प्रवास हा जातिगायन, धृवागायन, प्रबंध, ध्रुपद-धमार आणि शेवटी ख्याल या प्रमाणे झालेला आहे. मोघलांच्या आक्रमणामुळे धृपद-धमार हा गीतप्रकार मागे पडला व त्याची जागा ख्याल गायनाने घेतली. ख्याल ही शृंगार रसपूर्ण, मधुर गायकी असल्यामुळे आजही ख्याल गायकी लोकप्रिय आहे. अशा या गीतप्रकाराची
माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे घेता येईल.
 
२) अर्थ व व्याख्या :- 
   ख्याल हा पर्शियन शब्द आहे. पर्शियन भाषेत ख्यालाचा अर्थ विचार किंवा कल्पना
असा होतो. आज शास्त्रीय संगीत म्हणजेच ख्यालगायन असे समीकरण झाले आहे.
“स्वतःच्या प्रतिभेने मुक्तपणे स्वर, ताल आणि शब्द यांच्या माध्यमातून रागाचे नियम सांभाळून सादर केलेला गीतप्रकार म्हणजेच ख्याल.” असे ख्यालाबद्दल स्थूलमानाने म्हणता येईल.
 
३) उगम :-
   तेराव्या शतकापर्यंत भारतीय संगीत एकच होते. उत्तरभारतीय आणि दक्षिण भारतीय संगीत असे भेदयात झालेले नव्हते. शारंगदेवांच्या काळात ‘साधारणगीति’ हा प्रकार प्रचलित होता. यातच ख्याल गायकीची बिजे सापडतात. याच काळात मोगलांचे आक्रमण झाले. त्यांनी इरानी व मुस्लिम संगीत पद्धत भारतात आणली. त्याचा परिणाम भारतीय संगीतावर झाला. यातून अमीर खुसरो याने ख्यालगायकी प्रचारात आणली. तर कांहीच्या मते पंधराव्या शतकात जोधपूरचा सुलतान हुसेन शर्की याने ख्याल गायनाचा प्रथम अविष्कार केला.
 
३) ख्यालाचे प्रकार :-
    ख्यालाचे मुख्य दोन प्रकार आहेत सा) बडा ख्याल, रे) छोटा ख्याल
सा) बडाख्याल :
     विलंबित लयीत सादर केलेल्या बंदिशीस बडा ख्याल असे म्हणतात. थोड्याशा आलापाने याचे रागस्वरूप स्पष्ट होते. त्यानंतर विलंबित ख्यालाची स्थायी घेतली जाते. त्यानंतर तबलजी समेपासून
विलंबित दमदार ठेका धरतो. त्यानंतर गायक मुक्त आलाप, बहलावे व स्वरसौंदर्याची मुक्त बरसात करुन ख्याल भरतो. गायकाला राग नियम सांभाळूनही पुष्कळ स्वातंत्र्य असते. त्यानंतर गायक अंतरा सुरु करतो. तारसप्तकात आवाज पोहोचेल त्या स्वरापर्यंत तो रागाचा विस्तार करतो. त्यानंतर बंदिशीचा अंतरा पूर्ण करतो व पुन्हा स्थायीचा मुखडा पकडतो. या पूर्वार्धानंतर ख्यालाच्या उत्तरार्धात तो लय वाढवून सरगम, बोलताना, तानांचे विविध प्रकाराने ख्याल सजवतो.
रे) छोटा ख्याल :
     मध्यलयीत किंवा दृतलयीत सादर केलेल्या बंदिशीस छोटा ख्याल असे
म्हणतात. याचे स्थायी व अंतरा असे दोन भाग असतात. बडा ख्यालानंतर छोटा
ख्याल गायला जातो. याची बंदीश स्वतंत्र असते. आलाप, ताना, बोलआलाप,
बोलताना इ. अलंकारिक बाबींनी ख्याल नटविला जातो.
 
४) ख्यालाचा विषय :-
     ख्याल गायनाचा विषय ईशस्तुती, राजाची स्तुती, ऋतुवर्णन, सासूसुनांचा कलह, श्रृंगाराच्या विविध छटा, बोधपर वचने इत्यादि ख्यालाचे विषय असतात. ख्याल हा ब्रज, हिंदी, पंजाबी व उर्दू भाषेत असतो. त्याची बंदिश संक्षिप्त असते. बडा ख्याल विलंबित लयीत सादर केला जातो. 
 
५) ख्यालासाठी ताल :-
     विलंबित ख्याल विलंबित एकताल,
झुमरा, तिलवाडा व तीनताल इत्यादि तालात गायला जातो. तर छोटा ख्याल त्रिताल, मध्य एकताल, झपताल, आडा चौताल व रुपक इ. तालात गायला जातो.
     
६) वाद्ये :-
      ख्याल गायनासाठी दोन तंबोरे,स्वरमंडल, सारंगी, हार्मोनियम व तबला या वाद्यांचा उपयोग केला जातो. काहीवेळा भोपळ्याच्या तांबोऱ्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक तानपुरा वापरला जातो.
 
७) समारोप :-
शांत, मधुर व शृंगाररसाने नटलेला हा गीतप्रकार आज लोकप्रिय झालेला आहे. धमार-धृपदाप्रमाणे जटील लयकारी नसल्यामुळे सर्वसामान्य श्रोतेही ख्यालाकडे आकर्षित होतात. रागाचा परमोच्च बिंदु ख्यालातच साधला जातो.
 
 
४.२. ठुमरी.
१) प्रस्तावना :-
    ख्याल गायकीनंतर ठुमरी हा गीत प्रकार उदयास आला. ठुमरी हा उपशास्त्रीय
संगीताचा प्रकार आहे. याची रचना सुमधुर असते. शृंगार रसाने परिपूर्ण असलेल्या ठुमरी या गीताची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे घेता येईल.
 
२) उगम :-
     ‘ठुमकणे’ या क्रियापदाशी ठुमरी या शब्दाचा संबंध जोडला जातो. ठुमरी या
गीतप्रकाराचा उगम हा प्राचीन काळातच झाला असावा. भरतमुनीच्या नाट्यशास्त्रात डोंबिका नृत्याचा उल्लेख सापडतो. याचबरोबर याच ग्रंथात ‘लास्य’ या शब्दाचा उल्लेख आहे. त्यामुळे ठुमरीचे मूळ या दोन गीतप्रकारात आढळते. कालिदासाच्या नाटकात ‘चलित’ नावाच्या नृत्याचा उल्लेख आहे. त्यातही ठुमरीचे मूळ शोधता येईल.
ठुमरी हा गीतप्रकार सुरुवातील नृत्याशी संबंधित होता. तत्कालीन बादशहांचे मनोरंजन करण्यासाठी काही स्त्रिया साभिनय नृत्य करुन ठुमरी सादर करायच्या. १९ व्या शतकात अयोध्येचा नवाब वाजिदशाह याने या गीतप्रकाराला प्रोत्साहन दिले. त्याने ‘अख्तरपिया’ या टोपन नावाने अनेक ठुमरीच्या रचना केल्या.
 
३) ठुमरीची घराणे :-
       १९ व्या शतकात ठुमरीची दोन घराणी प्रचारात आली.
१) पुरब अंगाची ठुमरी, २) पंजाब अंगाची ठुमरी
     बनारस व लखनौ या ठिकाणी प्रचलित असलेल्या ठुमरीला पूरब अंगाची ठुमरी म्हणतात. बोल बाट व बोलबनावाने ही ठुमरी नटविलेली असते. सरळ व शुद्ध स्वर रचनेने ठुमरीचा गोडवा वाढविला जातो. तर पंजाबी ठुमरी शृंगार रसाकडे झुकलेली असते. मूर्क्या, खटके, चमत्कृतिपूर्ण स्वरमालिका इ. बाबी पंजाबी अंगाच्या ठुमरीत दिसून येतात.
 
४) साथसंगत व ताल :-
       या गीत प्रकाराच्या साथीसाठी तबला हे तालवाद्य आणि सारंगी, हार्मोनियम इ. स्वरवाद्ये वापरली जातात. ठुमरीचे स्थायी आणि अंतरा असे दोन भाग असतात. ठुमरी ही शक्यतो दिपचंदी याच तालात गायली जाते. याबरोबरच अध्धा, पंजाबी, केहरवा आणि दादरा याही तालात ठुमरी गायली जाते.
       
५) राग व विषय :-
      शब्दप्रधान असलेला ठुमरी हा गीतप्रकार खमाज, देस, काफी, तिलंग, भैरवी, पिलू इत्यादि रागात बांधलेला असतो. कृष्णलीला, शृंगारछटा व विरहिनीचे आर्त उद्गार इ. ठुमरीचे विषय असतात.
 
६) कलावंत :-
     सिद्धेश्वरीदेवींनी ठुमरी या गीतप्रकाराला प्रतिष्ठा मिळवून दिली. सिद्धेश्वरीदेवी बरोबरचं रसूलन बेगम, गिरिजादेवी व बेगम अख्तर या पूरब अंगाची ठुमरी गायच्या. पंजाब अंगाची ठुमरी बडे गुलाम अली, त्यांचे बंधू बरकत अली खाँ हे गायचे. उ. अब्दुलकरीम खाँ यांनी सुद्धा एक वेगळ्या ढंगाची ठुमरी प्रचारात आणली.
 
७) समारोप :-
     आलाप, निरनिराळ्या मुर्क्या, खटके आणि हरकतींनी नटलेला ठुमरी हा गीतप्रकार सुरुवातीला जरी नृत्याशी संबंधीत असला तरी आज हा गीतप्रकार कथ्थक नृत्यात विविध भावमुद्रा व पदविन्यासासह सादर होतो. गाण्याच्या मैफलीतूनसुद्धा ठुमरी गायली जाते.
 
 
 
४.३  सुगम संगीत – गझल
 
१) प्रस्तावना :-
भारतीय संगीतातील लोकप्रिय म्हणजेच गझल होय. गझल हा एक वृत्ताचा, काव्याचा आणि गायनाचा प्रकार आहे. भारतावर अनेक आक्रमणे झाली. त्यामध्ये मुस्लीम शासकांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. मुस्लीम शासकांच्या दरबारात अनेक कलावंत आश्रयाला रहात असत. त्या माध्यमातूनच ‘गझल’ हा गीत प्रकार भारतीय संगीतामध्ये समाविष्ट झाला. इस्लामी संस्कृतीकडून भारतीय संगीतास मिळालेल्या देणगीत या सुगम गायनप्रकाराचा समावेश होतो
 
२) गझलची निर्मिती :-
गझल हा प्राचीन गीत प्रकार असून अरबी काळात या गीतप्रकाराची निर्मिती झाली. गझल हा उर्दू भाषेतील गीतप्रकार आहे. प्राचीन इराणमधील या प्रेमगीतांचा प्रकार सूफी संतांच्या माध्यमातून भारतात रूजला.
 
३) गझलची वैशिष्ट्ये :-
ईश्वर व भक्ताचे नाते, प्रेम, सौंदर्य वर्णन असे विविध काव्यविषय गझल या गीतप्रकारात असतात. भक्ती व शृंगाररसाचा मिलाप यात प्रकर्षाने आढळतो. यामध्ये शब्दांना विशेष महत्त्व दिले असल्यामुळे गझल हा शब्दप्रधान गीत  प्रकार आहे. गझलमधील खास वैशिष्ट्य म्हणजे शेर होय. गझलचे अनेक चरण असून प्रत्येक दोन चरणांच्या खंडास ‘शेर’ असे म्हणतात. एका गझलमध्ये कमीतकमी पाच शेर असतात. शेरातील दोन सारख्या चरणांना मिळून ‘मिसरा’ म्हणतात. शेराच्या शेवटी येणाऱ्या व सारख्या ध्वनी असणाऱ्या शब्दांना ‘काफिया’ म्हणतात.
 
४) साथसंगत :-
गझलच्या साथीसाठी हार्मोनियम, सारंगी, व्हायोलिन, संतुर, तबला इत्यादी वाद्ये वाजवली जातात. गझलसाठी दादरा, रूपक, केरवा, पश्तो हे ताल बहुधा वापरले जातात. पहिला शेर विलंबित लयीत आणि बाकीचे मध्य लयीत गायले जातात.
 
५) गझल गायनाची पध्दत :-
ज्या रागांत ठुमरी व टप्पा हे गायनप्रकार गायले जातात, त्याच रागांत हा गीत प्रकार आकर्षक अशा चालीमध्ये गायला जातो. अर्थात रागविस्तार वा रागाची शास्त्रोक्तता
यांवर भर नसतो. गझल गायनाचा विस्तार काव्यामधील अर्थाच्या अनुषंगाने करावा लागतो. आलाप आणि तानांचा मुक्त उपयोग यामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.
 
६) गझल प्रकार :-
फारसीतून मराठीत गझल आणली ती माधव ज्युलियन यांनी. यापूर्वी माणिकप्रभू आणि मोरोपंतांनीही हा काव्य प्रकाराची निर्मिती केली होती. त्यानंतर प्रामुख्याने सुरेश भट यांनी मराठी गजलसाठी मोलाचे योगदान दिले.
 
७) गझल गायक :-
गुलाम अली, जगजीतसिंग, बेगम अख्तर, शोभा गुर्टू, मेहंदी हसन, हरिहरन, पंकज उधास यांनी हिंदी गझल तर भीमराव पांचाळे यांनी मराठी गजल घराघरात पोचवली.
 
८) समारोप :-
दशकानुदशके सांस्कृतिक, सामाजिक पातळ्यांवर बदलत्या अवस्था पाहत पाहत उर्दू गजल आता भारतात रुजलेली मात्र ती बरीच बदलली आहे. मीर गालिबच्या काळातील आहे. प्रेम,व्यथा हे विषय जरी तसेच राहिले असले तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात सामाजिक विषय, राजकीय परिस्थितीचे उल्लेख येऊ लागले आहेत. आता गजल उर्दूमध्ये मधून हिंदी, बंगाली गुजराती व मराठी या इतर बहिणींकडे स्थलांतरित व्हायला लागली आहे.
 
 
४.४ पोवाडा
१) प्रस्तावना :-
पोवाडा हा मराठी लोकसंगीतातील एक लोकप्रिय कला प्रकार आहे. पोवाड्याला पवाडा असेही म्हणतात.संस्कृती भाषेतील प्र + वेद्  अशा दोन धातूपासून बनला आहे.  ज्याचा अर्थ ‘गौरव करणे’ किंवा स्तुती करणे असा आहे.
 
२) उगम :- 
     दहाव्या शतकापासून आपल्या देशात विविध भाषांमध्ये स्तवनात्मक काव्ये रचली जात होती. त्यांना ‘रासो’ असे म्हणत असत. पोवाडा हे सुद्धा स्तवनात्मक काव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील काही रोमहर्षक प्रसंग पद्यात वर्णन केले आहेत. तेही पोवाडा या प्रकारात येतात.
 
३) पोवड्याचे सादरीकरण :-
     पोवाडा हा वीर रसात सादर केला जातो. त्याला अनेकवेळा कारुण्याची झालर असते. पोवाड्याची रचना लहान गयात्मक वाक्यांची असते. त्याला पद्याची म्हणजेच काव्याची जोड दिलेली असते. पोवाड्याच्या बोलीभाषेत जिवंतपणा असतो. यातील चरण चार मात्रांच्या आवर्तनात गायले जातात. यातील
परिच्छेदाला चौक  ही संज्ञा असते. चरणाच्या शेवटी झिलकरी जीऽ जीऽ ची म्हणत साथ करीत असतात. शाहीर  पोवाड्यातील घटनांत   जिवंतपणा येण्यासाठी त्याचे केवळ निवेदन करीत नाही तर त्याचे दर्शन घडवितो. श्रोत्यांना तो विषय समजावा यासाठी शाहीर त्यातील पात्रे अभिनयाद्वारे उभी करतो.
 
४) वेशभूषा :-
     पोवाडा सादर करण्यासाठी शाहीर महाराष्ट्रीयन वेशभूषा करतो. तो घेरदार बाराबंदी घालतो. खाली धोतर किंवा चुडीदार पायजमा परिधान करतो. डोक्यावर फेटा बांधलेला असतो. कमरेला शेला गुंडाळलेला असतो. कपाळावर कुंकवाची चंद्रकोर असते. गळ्यात कवड्यांच्या अथवा मोत्यांच्या माळा परिधान करतो.
     
५) साथसंगतीची वाद्ये :-
     पोवाड्याच्या साठीसाठी शाहीर हातात डफ घेतो. तो स्वतः वाजवत पोवाडा सादर करतो. याबरोबरच हार्मोनियम, ढोलकी, दिमडी, शिंग (तुतारी),क्लॉरोनेट, ट्रॅगल, झांज, डुंगरू, खंजिरी अशी वाद्ये पोवाड्याच्या साथीसाठी वापरली जातात. गायनाच्या साथीसाठी सहगायक/गायिका असतात.
 
६) शाहिरांचे योगदान :-
     पेशव्यांच्या कारकिर्दीत शाहीर राम जोशी, अनंत फंदी, होनाजी बाळा, पठ्ठे बापूराव, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इत्यादी शाहिरांनी मोलाचे योगदान दिले आहे.
    पुढील काळात शाहीर कृष्णराव साबळे, शाहीर पिराजी सरनाईक, शाहीर किसनराव हिंगे, शाहीर विठ्ठल उमप, शाहीर बाबासाहेब देशमुख, शाहीर अमर शेख यांनी पोवाड्याला  लोकप्रियता मिळवून दिली.
    
७) समारोप :-
  पोवाड्याच्या माध्यमातून शूरवीरांच्या कार्याचा गौरव केला जातो. त्याचबरोबर विविध सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सुद्धा पोवाड्याने अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी आणि भ्रष्टाचार यांसारख्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम शाहिरांनी पोवाड्यातून केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जनजागृती करण्यासाठी पोवाड्यांचाही वापर केला गेला.
 
 
 
५ वादन
५.१ सतार
१) प्रस्तावना :-
     कधी काळी सिंधू संस्कृती पासून प्रचलित असलेले वीणा हे वाद्य आज दिसेनासे झाले आहे. त्या ऐवजी आज सतार हे सर्वात लोकप्रिय वाद्य वीणा गटाचे प्रतिनिधित्व करीत आहे. या वाद्याला ‘क्वीन ऑफ इन्स्ट्रुमेंट’ असेही म्हणतात. पंडित रविशंकर यांच्यासारख्या थोर कलावंतांनी सतार या वाद्याला भरतरत्नाचा मुकुट चढविला. अशा या सतार वाद्याची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे पाहता येईल.
 
२) उगम :-
      सतार हे वाद्य तंबोरा आणि यातून वीणा या दोन वाद्यांच्या एकत्रीकरणातून निर्माण झाले आहे. अमीर खुसरो यांनी फारस किंवा इराणमधून हे वाद्य भारतात आणले म्हणून अमीर खुसरो यांना या वाद्याचे जनक मानले जाते. सतार या तंतुवाद्याला सतार,सेतार,सेतारा अशा विविध नावांनी ओळखले जाते.
      
३) सतारीतील परिवर्तने :-
     सतार या वाद्याचे मध्य पूर्वेतील तंबूर व पंडोर या वाद्याशी नाते जोडले जाते. चार हजार वर्षांपूर्वीच्या मेसोपोटेमियामधील पुतळ्यावर व मुद्रांवर अशा वाद्यांच्या प्रतिमा आढळतात. फारशी भाषेत याला तार, दु-तार, सेह-तार इत्यादी नावे आहेत. सारंगदेवांच्या ‘संगीत रत्नाकर’ या ग्रंथात तीन तारांच्या वाद्याला ‘त्रितंत्री’ असे म्हटले आहे. या वाद्यात काळानुरूप बदल होत गेले व सध्या प्रचलित असलेल्या सात तारांची सतार हे वाद्य निर्माण झाले.
 
४) सतारीची रचना :-
      सतारीचा आकार हा सर्वसाधारणपणे तंबोऱ्यासारखा असतो. तांबोऱ्या प्रमाणेच  एक भोपळा, गळा व एक पोकळ लाकडी दांडी असते. ही दांडी वरच्या बाजूने चपटी व खालून गोलाकार असते. याची लांबी ३ फूट व रुंदी ३ इंच असते. या दांडीवर वक्राकार पितळी किंवा पंचधातूचे पडदे असतात. तारांच्या आधारासाठी हस्तिदंताची पट्टी व घोडी(ब्रिज) बसवलेली असते. याला सात खुंट्या असतात. तारा स्वरात मिळवण्यासाठी या खुंट्यांचा उपयोग होतो. यातील सात तारा पोलाद व पितळेच्या असतात. शेवटच्या दोन तारांना चिकारीच्या तारा असे म्हणतात.
 
५) वाजविण्याची पद्धत :-
       सतार वाजविण्यास कठीण असते. उजव्या हाताच्या तर्जनीवर घातलेल्या मिजराबीने (नखीने) तारा छेडल्या जातात. उजव्या हाताच्या अंगठा खालच्या भोपळ्यावर धरल्याने उजवा हात स्थिर राहतो. सतारवादन हे प्रामुख्याने आलाप, जोड, झाला या क्रमाने वाजवतात. यात मासितखानी ही विलंबित लयीत गत वाजवतात व नंतर रजाखानी गत वाजवतात. चिकारीच्या तारेवर पहिल्या बोटाने किंवा करंगळीने झंकार निर्माण करतात. याला झाला असे म्हणतात. या वाद्याच्या साथीसाठी तबला हे वाद्य वापरले जाते. अलीकडच्या काळात तबल्याबरोबरच पखवाज ही साथीला घेतला जात आहे.
 
६) कलावंतांचे योगदान :-
      अमीर खुसरो यांची दोन मुले अमिर खाँ व मज्जित खाँ हे सतारवादन पारंगत होते. आधुनिक काळात उस्ताद विलायत खाँ व पंडित रविशंकर, निखिल बॅनर्जी, शाहिद परवेज, उस्ताद शाकीर खाँ यांनी या वाद्याला सातासमुद्रापलीकडे पोचवून देश-विदेशात प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. पंडित रविशंकर यांनी सतारीला भरतरत्नाचा मुकुट चढविला आहे.
 
७) समारोप :-
       वर्तमान काळात सतार या वाद्याला अत्यंत लोकप्रियता मिळाली आहे. स्वतंत्र वादन, विविध गीत प्रकार, विविध वाद्यवृंदाच्या रचना, चित्रपटाचे पार्श्वसंगीत व फ्युजन यासाठी सतार हे वाद्य आज अनिवार्य होऊन बसले आहे.
 
 
२) सनई 
 
१) प्रस्तावना :- 
     सनईचे मंजुळ स्वर ..! जे ऐकताना सभोवतालचे वातावरण मंगलमय होते. सनईचा अमृतरस कानावर पडतो आणि मन प्रसन्न होते. लग्न समारंभ असो की कोणताही सामाजिक, सांस्कृतिक उत्सव असो तेथे सनईचा स्वर निनादला नाही तरच नवल ! अशा या मंगल स्वराला लोकमान्यता आणि त्याहीपेक्षा राजमान्यता देण्याचे महान कार्य केले ते स्वर्गीय उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांनी ! लोकधुनीपुरतं मर्यादित असलेल्या या वाद्याला त्यांनी भारतरत्नाचा मुकूट चढविला. अशा महान सनई या वाद्याचा आढावा पुढीलप्रमाणे घेता येईल.
 
२) सनईचा इतिहास :-
   सुषिर वाद्यगटातील सनईला सुर्ना, नाई, शहनाई अशी अनेक नावे आहेत. उत्तर भारतात ‘शहनाई’ म्हणून हे वाद्य ओळखले जाते. दाक्षिणात्य संगीतातील  ‘नादस्वरम्’ हे वाद्य सनईसारखेच असते. सनई भारतात मध्यपूर्वेतील मुस्लिम देशांतून विशेषत: इराणमधून आली, असे एक मत आहे. इराणी ‘सुर्ना’ हे वाद्य भारतात येऊन त्याचे रूपांतर सनईत झाले असेही म्हणतात. कालांतराने शहनाई व सनई ही दोन्ही नावे महाराष्ट्रात प्रचलित झाली. 
    ‘बृहद्देशी’ या ग्रंथात ‘महुवरी’ या वाद्याचा उल्लेख आढळतो. हे वाद्य सनई सारखे आहे. शारंगदेवांच्या ‘संगीत रत्नाकर’ या ग्रंथात ‘माधुकरी’ या वाद्याचा उल्लेख आढळतो. हे वाद्य सनाईचेच रूप आहे. 
 
३) सनईची रचना :-
      सनईची रचना चार भागात केलेली असते.
अ) नळी ब) पावी क) जिभाळी ड) अन्नस
अ) सनईची नळी:
सनईची नळी खैर, शिसम, चंदन या लाकडापासून बनवतात. गोलाकार व आतून पोकळ अशी याची रचना असते. ती सरळ लांबीची असून एका टोकाला बारीक व दुसऱ्या टोकाला रुंद होत गेलेली असते. बारीक टोकाकडून ती फुकली जाते. ही ६० ते ९० सेमी लांबीची असते.
ब) पावी:
नळीच्या रूंद टोकाला आवाज फेकण्यासाठी घंटाकार कर्णा असतो. त्याला पावी किंवा पाई म्हणतात. ती बहुधा धातूची बनविलेली असते.
क) जिभाळी:
लाकडाच्या काडीत पानाची दोन पत्तीची जिभाळी घट्ट बसवली जाते. सनईमध्ये आठ वादनरंध्रे व चार नियमनरंध्रे असतात. सनईच्या नळीवरची सात रंध्रे वाजवण्यासाठी वापरतात व बाकीची मोकळी किंवा मेणाने बंद करतात. 
ड) अन्नस:
सनईच्या शेवटच्या छिद्रापासून थोडया अंतरावर खोबणीत एक कर्णाच्या आकारासारखे धातूचे भांडे बसवितात, त्याला अन्नस म्हणतात. त्यामुळे सनईवादन अत्यंत श्रवणीय होते.
 
४) सनईची वादन पद्धती :-
   सनई हे वाद्य आनंदाबरोबरच दुःखद प्रसंगीही वाजवले जाणारे वाद्य आहे. पूर्वी हे वाद्य केवळ लोकधूनी पुरते मर्यादित होते. पण वर्तमानात सनईमधून ख्याल, ठुमरी या शास्त्रीय वादनाबरोबरच चैती, कजरी व भावसंगीतही वाजविले जात आहे. सनई वादन करताना प्रामुख्याने ओठ, जीभ व हातांच्या बोटांचा वापर महत्त्वपूर्ण ठरतो. वादन श्रवणीय,कर्णमधुर होण्यासाठी नळीतील हवेच्या दाबावर नियंत्रण ठेवावे लागते. सनई वादनाच्या साथीसाठी सूरपेटीची आवश्यकता असते. सनईवादन चालू असताना फुंकर अखंड ठेवून त्या माध्यमातून आधारस्वर सतत गुंजत ठेवतात. नगारा, चौघडा, खुर्दक या वाद्यांबरोबरच अलीकडील काळात तबला या वाद्याची साथ घेतली जाते.
 
५) कलावंतांचे योगदान :-
भारतरत्न उ. बिस्मिल्ला खाँ हे जागतिक दर्जाचे सनईवादक होते. उ. बिस्मिल्ला खाँ यांचे वडील पैगंबर बख्श, मामा अलिबख्श, बंधू शमसुद्दीन खाँ, सुपुत्र नझिम खाँ या सर्व कलावंतांचे सनई वादनातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. अन्य कलावंतांमध्ये अली अहमद हुसेन, बलजीतसिंग नामधारी, कृपाल सिंग, गुरुबक्ष सिंग, अनंतलाल, सूर्यकांत खळदकर, शंकरराव गायकवाड, प्रमोद गायकवाड, तुकाराम दैठणकर, नम्रता गायकवाड हे सनई वादनासाठी प्रसिद्ध आहेत.
 
६) सनई वाद्याची लोकप्रियता :-
 आकाशवाणीच्या अनेक केंद्रांवर कार्यक्रमांची सुरुवात सनई वादनाने होत असते. सनई वाद्यावर शास्त्रीय संगीताची अभिव्यक्ती होऊ लागली आहे. गुंज उठी शहनाई या चित्रपटापासून लगान या चित्रपटापर्यंत अनेक चित्रपटातून सनई घराघरात जाऊन पोहोंचली आहे.
 
 
 
 
 ५.३ जलतरंग    
 १) प्रस्तावना:-
 अश्मयुगीन काळात शिकार करत असताना एक दगड दुसऱ्या दगडावर आदळला गेला असावा आणि यातून घनवाद्याची निर्मिती झाली असावी. भारतीय संगीतामधील शास्त्रशुद्ध पद्धतीने वाजविले जाणारे घनवाद्य म्हणजे जलतरंग होय.
 
प्राचीन काळापासून वर्तमानकाळापर्यंत या वाद्यामध्येही अनेक लक्षणीय बदल घडून आले. जलतरंग या वाद्याची महिती
पुढील मुद्यांच्या आधारे पाहता येईल.
 
२) जलतरंगचा उगम :-
जलतरंग हे प्राचीन भारतीय नादवाद्य आहे. या वाद्याचा शोध चौथ्या ते सहाव्या शतकात लागल्याचे मानले जाते. या वाद्याला उदक, जलवाद्य किंवा जलतंत्री वीणा असेही म्हटले
जाते. पूर्वीच्या काळी धातूच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून वाजवले जाणारे हे वाद्य अलीकडील काळात मात्र चिनीमातीचे बाऊल
वापरून वाजवले जाते. महाभारत काळात या वाद्याला जलयंत्र या नावाने ओळखले जायचे.
 
३) जलतरंगची रचनाः-
हे वाद्य चिनीमाती, धातू किंवा पितळेच्या वेगवेगळ्या आकाराच्या वाट्यापासून तयार केले जाते. यात कमीतकमी १२ व
जास्तीत जास्ती २६ लहानमोठ्या आकाराच्या वाट्या असतात. अर्धगोलाकार पध्दतीने या सर्व वाट्यांची मांडणी केली जाते व त्यामध्ये पाण्याचा स्वरानुरूप वापर केला जातो. आपल्या शरीरात जसे ८० टक्के पाणी असते तसे या वाद्यातही ८० टक्के पाणी असते. या वाद्यात सगळी भांडी मिळून पाच लिटर पाणी लागले.
 
४) जलतरंगाची वादन पध्दती :
चिनी मातीच्या कडांवर बांबूच्या किंवा प्लास्टिकच्या काठ्यांनी हे वाद्य आघात करून वाजविले जाते. रागाच्या, गीताच्या
अनुषंगाने अनेक लहान मोठ्या वाट्या कमी जास्त पाणी भरून अर्धगोलाकार रचना करून जलतरंगाचे वादन केले जाते. भांड्यातील पाण्याची पातळी कमी जास्त केल्यास स्वर बदलतात. पाणी भरलेल्या वाट्यांच्या कडांवर लाकडी काड्यांनी हलकेच टिचकीसारखा आघात करून यातून नाद निर्माण केला जातो. या आघाताने पाण्यावर तरंग उठतात आणि त्यातून वादक आपल्या कौशल्याने संगीताची वैविध्यपूर्ण निर्मिती करतो. कधी जोरात तर कधी हलक्या आघाताने हे वाद्य वाजविले जाते. जलतरंगाचा आवाज थेट अंतर्मनात जातो. त्यामुळे संगीतोपचारामध्ये त्याचा वापर करतात.
 
५) जलतरंग वादक :-
जलतरंग या वाद्याला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी अनेक कलावंतांनी मोलाचे योगदान दिले आहे. यात प्रामुख्याने पं. दत्तोपंत मंगळवेढेकर, कुमार पंकज साखरकर, मिलींद तुळाणकर, रामराव परसातवार, मास्तर बर्वे, शंकर विष्णू कान्हेरे, सिता दोरया स्वामी, रागिणी त्रिवेदी इत्यादी कलावंतांचा नामोल्लेख करता येईल.
 
६) समारोप :-
 म्हटलं तर घन वाद्ये ही केवळ ताल देण्यासाठी सहाय्यक वाद्य म्हणून उपयुक्त ठरतात. शास्त्रीय वाद्य म्हणून या वाद्यांचा म्हणावा तसा विकास झाला नाही. परंतु जलतरंग या वाद्याला मात्र शास्त्रीय वाद्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. अर्थात यासाठी ज्या कलावंतांनी या वाद्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी लागेल.
 
 
५.४ ढोलकी
 
१) प्रस्तावना :-
     महाराष्ट्रातील लोकप्रिय लोकवाद्य म्हणजे ढोलकी. भरतमुनींच्या वाद्य वर्गीकरणानुसार अवनद्ध वाद्य या प्रकारात मोडणारे हे वाद्य आहे. ढोलकी हा शब्द उच्चारताच महाराष्ट्रातील लावणी हा नृत्यप्रकार डोळ्यासमोर उभा राहतो. ढोलकीचा तोडा वाजताच मन शृंगार रसाने भरून जाते. अशा ढोलकी या वाद्याची माहिती खालील मुद्यांच्या आधारे पाहता येईल.
     
२) ढोलकीचे अंग :-
ढोलकीचे अंग झाडाच्या खोडापासून तयार केलेले असते. सर्वसाधारणत: शिसम, खैर, बाभूळ, चिंच, साग वगैरे वृक्षांचे खोड ढोलकीसाठी वापरतात. शिसम व खैराचे खोड हे मजबूत व वजनदार असते. म्हणूनच खैर किवा शिसमची ढोलकी टिपेच्या स्वराला अधिक आसदार बोलते. हे खोड आतून पोकळ असते. याचा आकार उजवीकडे निमुळता होत गेलेला असतो. त्यामुळे या वाद्याचे उजवीकडील मुख (दायाँ) ४” ते ६’ रुंदीचे असते. तर डाव्या बाजूचे मुख हे (बायाँ) ८” ते १०” रुंदीचे असते. 
 
३) ढोलकीची पुडी :-
     खोडाच्या उजव्या मुखावर चामड्याची पुडी बसवलेली असते. चाटीकडील ही बाजू गोलाकार रिंगमध्ये चामडे ताणून शिवलेले असते. या पुडीला तबल्याप्रमाणे चाट नसते. या पुडीवर पातळ शाईचा थर लावलेला असतो. शाईचा थर जितका पातळ तितकी पुडी तार सप्तकात वाजते. शाई ही लोखंडाचा चूर्ण,सरस,मैदा किंवा तांदळाची खळ व दगडी कोळशाची पावडर यापासून बनवलेली असते. 
     डाव्या बाजूच्या पुडीवर शाई नसते. या पुडीला धुमपान असेही म्हणतात. बायाँकडील बाजूतून घुमारा निघण्यासाठी गरजेनुसार मेन लावतात. याला मेणी अथवा मसाला असेही म्हणतात. ढोलकीच्या बायाँकडील बाजूस चामडे मढऊन गजरा बनून खोडावर घट्ट बसवले जाते. या दोन पुड्या खोडाच्या मुखांवर घट्ट बसाव्यात यासाठी सुताच्या दोरीने घट्ट आवळल्या जातात. ढोलकी स्वरात लावण्यासाठी काड्यांनी पीळ दिला जातो. या काड्या दोरीमध्ये आवळून बसवलेल्या असतात. पूर्वी ढोलकी नऊ घरांची होती. परंतु सध्या सर्व ढोलक्या या स्क्रूच्या आणि दहा घरांच्या असतात. आजकाल नटबोल्टच्या साह्याने दोन्ही पुड्या बसवल्या जातात. पान्याच्या साह्याने नट आवळून ढोलकी स्वरात लावली जाते. ढोलकी ही तार सप्तकातील स्वरात लावली जाते.
 
४) ढोलकीची वादनपद्धती व बोल :-
      ढोलकी ही उजव्या हाताच्या बोटांनी व काही वेळा थापेच्या साह्याने वाजविली जाते. तर डाव्या हाताच्या बोटांनी व मनगटाच्या साह्याने याचा बायाँ वाजविला जातो. दादरा व केरव्याच्या लग्ग्या व नृत्याचे तोडे ढोलकीवर वाजविले जातात. ता ता ता, ना ना ना, धाऽ धाती नाऽ धाती असे बोल ढोलकीवर वाजविले जातात.
      
५) ढोलकी वादकांचे योगदान :-
     श्री. विजय चव्हाण, पांडुरंग घोटकर, यासीन म्हांब्री, विठ्ठल क्षीरसागर, निलेश परब इ. कलावंत ढोलकी वादनासाठी प्रसिद्ध आहेत. ते या लोकवाद्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
 
६) ढोलकीची साथ :-
    ढोलकीची शक्तिशाली ठेका लोकसंगीतात प्राण ओतण्याचे काम करतो. तमाशा, वगनाट्य, पोवाडा, लावणी, आराधी गीते, लोकगीत, खडीगंमत, शक्ती तुरा या सारख्या महाराष्ट्रातील अनेक लोककला प्रकाराच्या साथीसाठी ढोलकी हे वाद्य वाजवले जाते.
 
७) समारोप :- 
      ढोलकी हे पारंपरिक लोककलेतील लोकवाद्य आहे. असे असले तरी तिच्या गोडव्यामुळे व शृंगार रसाच्या निर्मितीमुळे आज तिचा वापर चित्रपट संगीतात मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. आज अनेक ढोलकी वादकांनी आपल्या वादन कौशल्याने ढोलकीला शास्त्रीय बैठक प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
 
६. ताल परिचय
 
६.१ ताल : दिपचंदी 
मात्रा : -१४
विभाग : -४ (३-४-३-४ मात्रांचे)
टाळ्या : -३ (१,४ व ११ व्या मात्रेवर)
काल :- १ (आठव्या मात्रेवर)
 
मात्रा १ २ ३  । ४ ५ ६ ७ ।
ठेका धा धीं S । धा धा तीं S ।
चिन्ह x      ।  २             
मात्रा ८  १० ११ |१२ १३१४|
ठेका  ता  तीं  S | धा धा धीं S|
चिन्ह ०          | ३
(या तालाचा उपयोग उपशास्त्रीय गीतप्रकारांसाठी होतो.)
 
     
 
६.२ ताल : – धुमाळी 
मात्रा :- ८ 
विभाग :-२ (४-४ मात्रांचे)
टाळी :- १ (पहिल्या मात्रेवर)
काल :- १ (पाचव्या मात्रेवर)
मात्रा १ २ ३ ४  । ५ ६  ७ ८
ठेका धीं धीं धा तीं । त्रक धीं धागे त्रक 
 चिन्ह ×              ।०
(या तालाचा उपयोग नाट्यसंगीत व सुगम संगीतासाठी होतो)
 
६.२ ताल :- भजनी 
मात्रा :- ८ 
विभाग :-२ (४-४ मात्रांचे)
टाळी :- १ (पहिल्या मात्रेवर)
काल :- १ (पाचव्या मात्रेवर)
मात्रा १       २      ३    ४।     ५     ६  ७  ८
ठेका धींS नाधीं  Sधी नाS। धींS नातीं Sतीं  नाS
चिन्ह ×                       । ०
 
 (या तालाचा उपयोग भक्तिसंगीत व कीर्तनासाठी होतो.)
 
६.३ ताल धमार 
मात्रा :- १४
विभाग :-४ (५,२,३,४ मात्रांचे)
टाळी :- १ (पहिल्या मात्रेवर)
काल :- १ (आठव्या मात्रेवर)
मात्रा १ २ ३ ४ ५।  ६  ७ ।
ठेका  क धी ट धी ट । धा S ।
चिन्ह  ×                । २      ।
मात्रा ८ ९  १०। ११ १२ १३ १४।
ठेका ग ति ट। ति ट ता S।
चिन्ह ०        । ३           ।
(या तालाचा उपयोग धमार या गीत प्रकाराच्या साठीसाठी होतो.)
 
६.४ ताल : – एकताल 
मात्रा : – १२ 
विभाग :-६ (२-२ मात्रांचे)
टाळी : – ४ (१,५,९,११ व्या मात्रेवर)
काल : – २ (३ व ७ व्या मात्रेवर)
 
मात्रा :- १ २  ।  ३    ४  ।  ५  ६  ।
ठेका :- धीं धीं । धागे त्रक। तू ना।    
चिन्ह :- ×      । ०         ।  २  
मात्रा :- ७  ८  ।  ९   १०   । ११ १२
ठेका :-  क त्ता । धागे त्रक । धी ना ।
चिन्ह :- ०      ।   ३         ।४       ।
(या तालाचा उपयोग शास्त्रीय व सुगम संगीतासाठी होतो)
 
६.५ ताल : – चौताल 
मात्रा : – १२ 
विभाग : -६ (२-२ मात्रांचे)
टाळी :- ४ (१,५,९,११ व्या मात्रेवर)
काल : – २ (३ व ७ व्या मात्रेवर)
 
मात्रा :- १ २   । ३ ४   । ५   ६
ठेका धा धा । दिं ता। किट धा । 
चिन्ह ×      । ०         ।  २  
७  ८  ।  ९  १०  । ११  १२  ।
दिं ता । तीट कत । गदी गन ।
०      ।   ३         । ४          ।
(या तालाचा उपयोग धृपद गायकीसाठी होतो)
६.६ ताल – खेमटा
 
मात्रा : – ६
विभाग : -२ (३-३ मात्रांचे)
टाळी :- १ (पहिल्या मात्रेवर)
काल : -१  ( चौथ्या मात्रेवर)
 
मात्रा :- १    २      ३     । ४    ५      ६
ठेका :-  धीन धाती धाधा । तिन ताती धाधा 
चिन्ह :-  ×                     । ०
(या तालाचा उपयोग लोकसंगीत, सुगम संगीत व सिनेसंगीतासाठी होतो)
 
६.७ ताल – भजनी 
 
मात्रा :- ८
विभाग : -२ (४-४ मात्रांचे)
टाळी :- १ (पहिल्या मात्रेवर)
काल : -१  ( पाचव्या मात्रेवर)
 
मात्रा :-  १   २   ३   ४. ।  ५    ६     ७     ८।
ठेका :- धीS नाधीं Sधि नाS । तिS नातीं  Sतीं नाS ।
चिन्ह :- ×                     । ०                       ।
 
(या तालाचा उपयोग भक्ती संगीत व कीर्तनासाठी होतो)
 
 
७ नृत्य
७.१ भरतनाट्यम
 
१) प्रस्तावना :-
     कोणत्याही देशाचे वैभव तेथील संस्कृती व कलेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. भारत देशाला फार मोठा सांस्कृतिक व कलात्मक वारसा लाभलेला आहे. अशा या महान आणि विशालकाय भारत देशात विविध नृत्यप्रकार आपणास पहावयास मिळतात. ज्यात काही शास्त्रीय नृत्य आहेत तर अनेक लोकनृत्य सुद्धा आपणास दिसून येतात. त्यापैकी भरतनाट्यम् या नृत्य प्रकाराची माहिती आपणास खालील मुद्द्यांच्या आधारे पाहता येईल.
 
२) उगम :-
     भरतनाट्यम् हा भारतीय शास्त्रीय नृत्याचा एक प्रमुख प्रकार आहे. ज्याचा उगम तामिळनाडू या राज्यातील तंजावर जिल्ह्यात झाला आहे. भरतमुनींचे ‘नाट्यशास्त्र’ आणि नंदिकेश्वराचे ‘अभिनय दर्पण’ हे भरतनाट्यम् चे मूळ स्त्रोत मानले जातात. प्राचीन काळापासून दक्षिण भारतातील मंदिरे आणि दरबारांमध्ये त्याची भरभराट झाली आहे.
 
३) नृत्याचे स्वरूप :-
      कर्नाटकापासून दक्षिणेकडे मुस्लिम आक्रमणे न झाल्यामुळे तेथील कला व संस्कृती ह्या आजही शुद्ध स्वरूपात आपणास पहावयास मिळतात. दक्षिणेतील मंदिरात हे शास्त्रीय नृत्य मुळात देवदासी करत असत. भरतनाट्यम हे १९ व्या शतकापर्यंत केवळ हिंदू मंदिरांसाठीच राहिले.वसाहतवादी ब्रिटीश सरकारने १९१० मध्ये त्यावर बंदी घातली होती, परंतु भारतीय समुदायाने या बंदीचा निषेध केला आणि २० व्या शतकात मंदिराबाहेर त्याचे कार्यप्रदर्शन वाढवले. कर्नाटक संगीतातील हे शास्त्रीय नृत्य आज संपूर्ण देशभरात आपणास पहावयास मिळते.
      
४) भरतनाट्यम् नृत्याचा विषय :-
     या नृत्यात हिंदू वैदिक ग्रंथ, महाभारत, रामायण, पुराण कथेवर नृत्य सादर केले जाते.ऐतिहासिक नाटक ग्रंथांमधून घेतलेल्या पौराणिक कथा, आध्यात्मिक कल्पना किंवा धार्मिक प्रार्थना या विषयांवर नृत्य सादर केले जाते. नृत्यांगना कथेतील किंवा नाटकातील भिन्न पात्रांचा प्रवेश नृत्य व अभिनयाद्वारे सादर करतात.
 
५) भरतनाट्यमची साथसंगत :-
   भरतनाट्यमला दिले जाणारे संगीत हे दक्षिण भारतातील कर्नाटक शैलीतील आसते. यातील गायकाला नटुवनार म्हणतात. तो या संपूर्ण कामगिरीचा वाहक देखील असतो.जो नर्तकाचा गुरू असू शकतो. भरतनाट्यममध्ये पाठ केलेले श्लोक आणि मजकूर तामिळ, तेलगू , कन्नड आणि संस्कृतमध्ये असतात.
   या नृत्यासाठी मृदंगम्, नादस्वरम, झांज, बासरी, व्हायोलिन आणि वीणा या वाद्यांच्या साहाय्याने साथसंगत केली जाते.
   
६) नृत्याचा क्रम :-
   भरतनाट्यम् या नृत्यप्रकाराचे मुख्यतः सात भाग पडतात. त्या भागांना मार्गम् असे म्हणतात.
१) अल्लारिपू २) जतिस्वरम् ३) शब्दम् ४) वर्णम् ५) पदम् ६) तिल्लाना ७) श्लोकम्.
 
७) भरतनाट्यमची वेशभूषा :-
     भरतनाट्यम् नर्तकाचा पोशाख तमिळ हिंदूच्या वधूच्या पोशाखासारखा असतो. ते महाराष्ट्रीयन नऊवारीसारखी दिसणारी साडी नेसतात.दोन्ही पायांच्यामध्ये चुणीदार पंखा असतो. जी समोर पडते आणि जेव्हा ती गुडघे वाकवते किंवा पायाचे काम करते तेव्हा तो पंखा आकर्षित पद्धतीने दिसतो.
   नृत्यांगना विशेषत: तिच्या कानावर, नाकावर आणि मानेवर दागिन्यांनी सजलेली असते. तिच्या चेहर्‍यावर पारंपारिक रंगभूषा (मेकअप) केलेला असतो. त्यांच्या डोळ्याभोवती रेषा काढलेल्या असतात. जे दर्शकांना तिच्या डोळ्यांचे भाव पाहण्यास मदत करतात. तिचे केस पारंपारिक पद्धतीने बांधलेले असतात. बहुतेक वेळा सुवासिक फुलांनी ( वेणी किंवा गजरा ) बांधलेले असतात. पायात घुंगरू बांधलेले असतात.
 
८) समारोप :-
भरतनाट्यम नृत्यप्रकारात भक्ती योगा बरोबरच योग विद्येतील २० आसनांचा समावेश होतो. भक्ती मनोरंजन व शारीरिक स्वास्थ्यासाठी आज हे नृत्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन पोचले आहे. किंबहुना अनेक विद्यापीठांमध्ये पदवीसाठी भरतनाट्यम् या नृत्याचे शिक्षण दिले जात आहे.
 
 
७.२ कुचिपुडी
 
१) प्रस्तावना :-
कुचिपुडी हे आंध्रपदेशातील एक पारंपरिक नृत्य नाट्य आहे. जे आज शास्त्रीय नृत्य शैली म्हणून प्रचलित आहे. आंध्रप्रदेशात कुचिपुडी नावाचे गाव असून हे संपूर्ण गाव गेल्या अनेक
वर्षांपासून ‘कुचिपुडी’ नृत्यशैलीची साधना करीत आहे. अशा या कुचिपुढी नृत्याची माहिती पुढीलप्रमाणे पाहता येईल.
 
२) उगम :-
कुचिपुडी या नृत्यशैलीचा उदय कृष्णदेवराय यांच्या काळात झाला. वैष्णव भक्तीने ओतप्रोत भरलेला हा नृत्यप्रकार आहे. सहाव्या शतकातील भक्ती संप्रदायाची चळवळ पुढे नेण्यात या नृत्याचे विशेष योगदान आहे. कुचिपुडी या गावात रामायणातील कथा या गीत, नृत्य आणि अभिनयाच्या माध्यमातून सादर करणारे नट समूह आहेत. त्या समूहाला ‘कुलशीव’ असे म्हणतात. यामध्ये अधिकतर पुरुष पात्राचा सहभाग असतो. भरतनाट्यम् आणि ओडिसी नृत्यशैलीचा समन्वयही या नृत्यप्रकारात साधलेला दिसून येतो.
 
३) राजाश्रय :-
विजयनगर साम्राज्याचे राजा कृष्णदेवराय तिसरा हे साहित्य आणि काव्याचा जाणकार होते. त्यांनी या नृत्याला प्रोत्साहन दिले. इसवी सन १६६८ मध्ये गोवळकोंडा येथील नवाब अब्दुल हुसेन तनहिशा याचा कूचिपूडि गावात तळ होता. त्या दरम्यान त्याने तरूण नर्तक सिध्देन्द्र योगी याचे नृत्य पाहिले आणि आनंदाने त्याला गौरव म्हणून ताम्रपट देऊन सन्मानित केले. हिंदू धर्म आणि त्यातील पौराणिक कथा यांची परंपरा जतन करून ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य या नृत्यशैलीने केले आहे.
 
४) सादरीकरण :-
या नृत्यशैलीमध्ये ‘शब्दम’ या प्रकाराला महत्व दिले जाते. भरतनाट्यमप्रमाणेच यात ‘तिल्लाना’ हा प्रकारही सादर होतो. पदललित्य हे या शैलीचे महत्त्वाचे अंग मानले जाते. नृत्याच्या शेवटी कलावंत थाळीमध्ये नर्तन करतो. हे नृत्य स्वतंत्र आणि लयदार पध्दतीने केले जाते. लास्य आणि तांडव या दोन्हीचे मिश्रण यात असते. प्रत्येक नर्तक हा तालाच्या साथीने करत रंगमंचावर प्रवेश करतो. संस्कृत कवी जयदेव यांच्या गीतगोविंद यांच्या काव्याचा या नृत्या त  प्रभाव जाणवतो.
 
५) वेशभूषा :-
या नृत्यासाठी नर्तक वापरत असलेला पोषाख हा भरतनाट्यम नृत्यशैलीच्या पोषाखासारखाच असतो. अंगसंचालन स्प्रिंगप्रमाणे वर-खाली पध्दतीने असते. त्यामुळे शरीरातील प्रत्येक भागावर अधिक मेहनत घेणे गरजेचे असते. कुचिपुडी हे मुख्यतः नाट्य असल्यामुळे यात नृत्यापेक्षा अभिनयाला अधिक प्राधान्य दिले जाते.
 
कलावंतांचे योगदान 
कुचिपुडी नृत्याला उच्च शिखरावर पोचविण्यासाठी वेम्पतिचिन्ना सत्यम्, सी. रामाचरियोलु, यामिनी कृष्णमूर्ती, शोभा नायडू, वैजयन्तीमाला, मल्लिका साराभाई, सुधा नायर यांनी मोलाचे योगदान दिले.
 
७) समारोप :-
भारतीय संस्कृती व कला आज साऱ्या जगावर अधिराज्य गाजवीत आहे. यात भारतीय नृत्याचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले आहे. मनाला आकर्षित करणारे कुचिपुडी नृत्य सुध्दा साऱ्या विश्वात लोकप्रिय होताना दिसते आहे. 
 
 
७.३ लावणी
 
१) प्रस्तावना :-
     विविधतेत एकता हिच याराष्ट्राची विशेषता आहे. विविध जाती,धर्म आणि संप्रदायाच्या सप्तरंगी छटेसोबतच येथे विविध नृत्यप्रकार सुद्धा पहावयास मिळतात. जसे की पंजाबचा भांगडा, आसामचा बिहू, गुजरातचा गरबा, तामिळनाडूचा कावडी अट्टम तर महाराष्ट्राची लावणी प्रसिद्ध आहे.  महाराष्ट्र राज्याच्या लोकसंस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असलेल्या लावणी या नृत्याची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे पाहता येईल.
     
२) लावणी शब्दाची उत्पत्ती :-
      ‘लावणी’ या शब्दाच्या व्युत्पत्तीविषयी निरनिराळी मते आढळतात. जसे शेतात रोपाची लावणी करताना म्हटले जाणारे गीत. पण लावणी हे लोकगीत असले, तरी कृषिगीत नव्हे. ‘लवण’ म्हणजे सुंदर. यावरून या नृत्याला ‘लावणी’ हे नाव पडले. कारण लावणीत विशेषतः स्त्रीसौंदर्याचे वर्णन असते. अक्षर शब्दांची शोभिवंत व सुभग जुळणी म्हणजे लावणी असे म्हणता येईल.
 
३) उगम :-
    महाराष्ट्र हे एकेकाळी युद्धग्रस्त राज्य होते. तत्कालीन सैनिकांच्या मनोरंजनासाठी लावणी नृत्य सादर करण्याची प्रथा पेशवे राजवटीत १८ व्या शतकात सुरू झाली. थकलेल्या सैनिकां चे मनोरंजन व्हावे व त्यांचे मनोबल वाढवणारे हे नृत्य होते. घरदार सोडून लढायला गेलेल्या शिपायाला रमविण्यासाठी शृंगाराची गाणी रचली जात. शिपायांच्या तळांवर त्यांचे गायन v नृत्य होई. याचप्रमाणे उत्सव, जत्रा इ.ठिकाणी लावणी सादर होत असे. अशा गरजांमधून मराठी भाषेत लावणीचा जन्म झाला. पेशवे राजवटीत जेव्हा स्वतः पेशव्यांनी शाही संरक्षण दिले, तेव्हा या नृत्याने लोकप्रियतेचा कळस गाठला. 
    
४) संतांचे व तंतांचे योगदान :-
     आज जुन्यांत जुनी उपलब्ध लावणी एकनाथकालीन (सोळावे शतक) आहे. ही वीरशैव संत शाहीर मन्मथ स्वामी यांनी लिहिली होती. या आध्यात्मिक लावणीत कराड क्षेत्राचे वर्णन दिसून येते. लावणीसाठी जसे संतांचे योगदान लाभले तसेच तंतांचे म्हणजेच शाहीरांचे सुद्धा अत्यंत मोलाचे योगदान लाभले आहे. ज्यात शाहीर रामजोशी, होनाजी बाळा, सगनभाऊ, अनंत फंदी  हे या कालखंडातील महत्त्वाचे लावणीकार शाहीर होते. इंग्रजांच्या  काळात पट्ठे बापूराव, शाहीर हैबती इ. अनेकांची नावे घेता येतात. लावणीचे आकर्षक
      स्वरूप ध्यानात घेता, आधुनिक काळात ग. दि. माडगूळकर, पी. सावळाराम, जगदीश खेबुडकर इ. गीतकारांनी लावण्या लिहिल्या. मराठी लोकनाट्याच्या विकासासाठी लावणीचे मोठेच योगदान आहे. 
 
५) लावणीची वेषभूषा :-
     लावणी नृत्यासाठी महाराष्ट्रातील परंपरेनुसार चालत आलेली नऊवारी साडी परिधान करते, विविध भरगच्च अलंकार, कमरपट्टा, बिंदीसह पायात घुंगरू बांधलेले असता. केसांचा अंबाडा व त्यावर गजरा मळलेला असतो .अशी चित्ताकर्षक वेशभूषा नर्तकी करतात. या नृत्यांगना सोळा शृंगार करून लावणी सादर करत असतात.
       
६) लावणीची साथसंगत :-
      सर्वसाधारणतः लावणीसाठी ढोलकी,तुणतुणे, झांज, घुंगरू, टाळ, तुणतुणे,पायपेटी यासारखी उच्च स्वरांची आणि मैदानात सादरीकरणास योग्य अशी वाद्ये लावणी गायनात वापरली जातात. लावणी ही ढोलकीच्या शक्तिशाली लयीसाठी प्रख्यात आहे. बैठकीच्या लावणीत मात्र तबला व  सारंगी सारखी वाद्ये वाजविली जातात.
      
 
७) लावणीचे प्रकार :-
      सर्वसाधारणतः सादरीकरणाच्या दृष्टीने पाहता लावणीचे तीन प्रकार मानता येतील.
(सा) शाहिरी लावणी : 
यात डफ-तुणतुण्याच्या साथीने शाहिर पद्यमय कथन किंवा निवेदन पेश करतो. त्याला उंच स्वराने झीलकरी संचामध्ये साथ करत असतात.
(रे) बैठकीची लावणी : 
तबला, पेटी, सारंगी, तंबुरी वगैरे वाद्यांच्या साथीने ही लावणी गायिका-नर्तिका बैठकीमध्ये सादर करतात. ह्य रचना उत्तर हिंदुस्थानी ठुमरीच्या धर्तीच्या असतात. याला माफक अभिनयाची, तसेच रागसंगीताची जोड देऊन बैठकीची लावणी सादर केली जाते.
(ग) फडाची लावणी :
ही लावणी नाच्या, सोंगाड्या इ. कलाकारांच्या साथीने नृत्य, संवाद आणि अभिनय यांची जोड देऊन ढोलकीवर गायली जाते. बालेघाटी, छक्कड, सवाल-जवाब,चौकाची रचना फडावर सादर केली जाते.
 
अभिजन रसिक वर्ग
सुरेखा पुणेकर यांच्या  ‘नटरंगी नार’ या  प्रयोगांनंतर खरेतर लावणीला महिला वर्गाचे आणि अभिजन वर्गाचे एक कलाप्रकार म्हणुन पुन्हा समर्थन मिळाले.पॅरिसच्या आयफेल टॉवर समोर भारत महोत्सवात नृत्य समशेर माया जाधव यांनी लावणी सादर केली. त्यामुळे लावणीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हा लावणीवर आधारित कार्यक्रम अमेरिकास्थित मराठी कलावंत डॉ. मीना नेरुरकर यांनी सादर केला.त्यामुळे लावणीकडे अभिजनवर्ग वळला. मनोरंजनासाठी लावणी चा चित्रपटात अत्यंत कल्पकतेने वापर केला गेला. अकलूज व शासनाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धेतून अनेक लावणी कलावंत प्रसिद्धीच्या झोतात आल्या.
 
८) समारोप :-
    उत्तान शृंगाराच्या आधिक्यामुळे आज आपले स्वत्व व सुसंस्कृत समाजातील लोकप्रियता घालवून बसलेल्या लावणीला व ती सादर करणाऱ्या अशिक्षित तमाशा कलावंत  वर्गाला पुनः चांगल्या तऱ्हेने सजग करण्याचे प्रयत्न आज महाराष्ट्र सरकार तमाशा शिबिरे, महोत्सव आदींचे आयोजन करीत आहे. पारंपरिक रीतीने लावणी परंपरा जोपासणाऱ्या कलावंतांना राज्य पुरस्कार देण्याची प्रथाही चालू आहे. यमुनाबाई वाईकर यांना लावणीतील विशेष योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. सुलोचना चव्हाण यांन